कर्माचे फळ आणि नशीब

                    आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडतो कि आपण नेहमीच चांगलं वागतो, कुणाच्या वाईटाचा स्वप्नात देखील विचार करत नाही.  तरीही आपल्या सोबत वाईट का घडत? त्याचवेळी आपल्या डोळ्यासमोर असे अनेक उदाहरण असतात जे वाईट वागत असतात परंतु त्यांचं सगळं आलबेल चाललं असत.  हे कस काय? आपल्याला तर लहानपणी पासून शिकवलं जात कि जे पेराल तेच उगवेल.  पाप केलं तर तुम्हाला यातना भोगाव्या लागतील,  आणि पुण्य केलं तर तुम्ही सुखी व्हाल.  साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे "कर्मण्ये वाधिकारासये...." पण आपल्या डोळ्यासमोर तर वेगळीच परिस्थिती आहे,  चुकीच्या मार्गानी पैसे कमावणारा आपले सगळे शानशौक पुरे करतोय तर कष्टाने,  सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करणारा मात्र छोट्या छोट्या गरजांसाठी लाचार आहे. 
                    इथेच कर्म सिद्धांत काम करत असत.  आपल्या भारतात अशी मान्यता आहे कि कुठलही मूल जन्माला आलं कि पाचवीच्या दिवशी सटवाई येऊन त्याच नशीब लिहिते आणि हे जे नशीब असत ते आपल्या मागील जन्मी केलेल्या कर्माचं फळ असत.  मागील जन्मी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा लेखाजोखा लक्षात घेऊन सटवाई आपलं नशीब लिहीत असते.  मग आपण या जन्मी कस वागतो याचा फारसा परिणाम आपल्या आयुष्यावर होत नाही,  कारण आपल्या नशिबात काय लिहिलंय त्यानुसारच आपल्या आयुष्यात घटना घडत जातात. 
                    काही लोक नशीब मानत नाहीत, ते आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात जे खरतर चांगलं हि आहे, पण अशा लोकांच्या आयुष्यातही काही अशा घटना घडतात ज्या अनाकलनीय असतात.  अनेकदा काही लोकांना खूप कष्ट करूनही यश लाभत नाही तेव्हा ती व्यक्ती सहज आपल्या नशिबाला दोष देते.  अशावेळी नशीब हि गोष्ट अस्तित्वात आहे हे स्पष्ट होते.  
                    मग आपल्या समोर असा प्रश्न पडेल कि, जर माझं हे आयूष्य माझ्या आधीच्या जन्माच्या कर्मांवर अवलंबून आहे तर मी या जन्मी कसाही वागलो तरी काय फरक पडतो जे नशिबात लिहिलंय ते तर घडणारच.  इथेच खरी गम्मत आहे.  डॉ. शरद उपाध्ये  म्हणतात, कि आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचं अकाउंट चित्रगुप्ताकडे असत.  आज आपण केलेल्या चांगल्या कर्मांनी जरी आपलं नशीब नाही बदललं तरीही संकटकाळी त्या पुण्याच्या अकाउंट मधला बॅलेन्स नक्की तुमच्या कामी येईल.  त्यामुळे चांगले कर्म करत राहा, प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असत.  एकाच वेळीजन्माला आलेल्या दोन जुळ्या भावंडांच नशीब सारखं नसत, कारण ते त्यांच्या मागील जन्माच्या कर्म फळ नुसार असत.  म्हणून कुणाशीही तुलना करू नका.  आपल्याला आयुष्य कस जगायचं आहे?  कण्हत कण्हत कि गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा.  शेवटी सुख हे भौतिक गोष्टीत नसून ते तुमच्या मनावर आणि विचारांवर अवलंबून असत.  कर्म करत राहा फळाची चिंता करू नका.


- सौ दीपाली हातेकर. 

Comments